Home क्राईम धक्कादायक : पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरूण मजूराचा करूण अंत !

धक्कादायक : पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरूण मजूराचा करूण अंत !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. एका निर्माणाधीन इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत असताना, बांधकाम धसल्याने तोल जाऊन पडल्यामुळे ३२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. मुकेश गोकुळ सोनार (वय ३२, रा. तानाजी मालुसरे नगर, असोदा रोड) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेरा चौकातील साबीर शेख यांच्या मालकीच्या इमारतीचे काम सध्या सुरू आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुकेश सोनार हे इतर दोन सहकाऱ्यांसोबत पाचव्या मजल्यावर सिमेंट भरण्याचे काम करत होते. मात्र, अचानक बांधकाम धसल्याने मुकेश यांचा तोल गेला आणि ते थेट जमिनीवर कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुरक्षेचा अभाव ठरला जीवघेणा :
घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी केली असता, इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी सुरक्षा जाळी किंवा इतर कोणतीही साधने उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षेच्या नियमांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळेच एका निष्पाप मजुराचा बळी गेल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

कुटुंबाचा आधार हरपला :
मयत मुकेश सोनार हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.


Protected Content

Play sound