पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील एका डॉक्टराला आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे. या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. या दोघांवरही सध्या उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींवरही विशेष लक्ष ठेवले जात आहे. सध्या तरी त्यांच्यामध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. शहरात यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
एरंडवणा येथील झिकाच्या रुग्णांपैकी पहिला रुग्ण हा ४६ वर्षीय डॉक्टर असून त्याच्या माध्यमातून त्याच्या १५ वर्षीय मुलीलाही याचा संसर्ग झाला आहे. सर्वप्रथम या डॉक्टरला ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली. स्वत: डॉक्टर असल्याने या व्यक्तीने स्वत:च्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी १८ जून रोजी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवला. त्यांना झिकाचा संसर्ग झाल्याचा अहवाल २० जूनला मिळाला. यानंतर या डॉक्टरच्या मुलीमध्येही झिकाची सौम्य लक्षणे दिसून आली. तिच्या रक्ताचा नमुना २१ जूनला राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवला गेला. या चाचणीमध्ये या मुलीलाही झिकाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या दोघांच्याही संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली आहे. दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये अद्याप तरी झिकाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.