Home क्राईम प्रांजल खेवलकर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट ; फॉरेन्सिक अहवालानंतर खळबळ

प्रांजल खेवलकर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट ; फॉरेन्सिक अहवालानंतर खळबळ


 पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पुण्यातील चर्चित खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार प्रांजल खेवलकर आणि अन्य सहा आरोपींनी कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे आढळले नाहीत, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकरसह अन्य सहा जणांना खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींचे रक्तनमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते. सदर अहवाल नुकताच पुणे पोलिसांना प्राप्त झाला असून तो न्यायालयातही सादर करण्यात आला आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणत्याही आरोपीच्या शरीरात अमली पदार्थांचे अंश आढळून आलेले नाहीत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, “प्रांजल खेवलकर यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नव्हता, तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे दाखवण्यात आले. नंतर पोलिस म्हणाले की ती ‘प्रिंटिंग मिस्टेक’ होती.” हे वक्तव्य समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

खडसे यांनी हा केवळ बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत, या प्रकरणात न्यायालयीन लढा देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. “फॉरेन्सिक अहवाल आता पोलिसांकडे आला आहे, त्यानुसार कोणताही ड्रग्ज सेवनाचा पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून लक्षात येते की, ही संपूर्ण कारवाई अपप्रचारासाठी रचलेली होती,” असे खडसे म्हणाले.

दरम्यान, प्रांजल खेवलकर यांना काही दिवसांपूर्वीच न्यायालयाकडून जामीन मिळाला असून, आता फॉरेन्सिक अहवालामुळे त्यांच्या बाजूने महत्त्वाचे समर्थन मिळाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन कार्यवाही काय दिशा घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


Protected Content

Play sound