धक्कादायक : सततच्या नापीकीला कंटाळून वृध्द शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

जळगाव/अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील एका वृध्द शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सायंकाळी कुटुंबिय शेतातून आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशोक बाबुराव बोरसे (वय-६१) रा. डांगरी ता.अमळनेर असे मयत वृध्द शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, अशोक बोरसे हे आपल्या पत्नी, मुलगा यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून अशोक बोरसे हे शेतातील सततच्या नापिकीमुळे विवंचनेत होते. सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता त्यांचा मुलगा शांताराम बोरसे व त्यांची पत्नी हे दोघे शेतात गेले होते. त्यावेळी अशोक बोरसे हे घरी एकटचे होते. त्यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी २ वाजता त्यांचा मुलगा शांताराम आणि पत्नी हे घरी आले. त्यावेळी दरवाजात आतून बंद होता. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर अशोक बोरसे यांनी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी खाली उतरवून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, शेतातील सततच्या नापीकीमुळे ते टेन्शनमध्ये होते. यातूनच त्यांनी गळफास घेतल्याची खबर त्यांचा मुलगा शांताराम बोरसे यांनी दिली आहे. याबाबत अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहे.

Protected Content