धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून आपल्या आई-वडिलांकडे जाण्यासाठी निघालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही धरणगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती शिक्षण घेत आहे. ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ती पाळधी येथून भुसावळ तालुक्यात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे जाण्यासाठी निघाली होती. तिच्या नातेवाईकांनी तिला रिक्षामध्ये बसवून दिले होते. परंतू पिडीत मुलगी ही घरी पोहचली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिच्याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.




