पुणे (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महा जनादेश’ यात्रेत पोलिसांनाच कार्यकर्त्यांच्या किंवा स्थानिक गावकऱ्यांच्या वेशात राबवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यासाठी पोलिसांना चार दिवशीय विशेष प्रशिक्षणही देण्यात आले होते. दरम्यान,उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे राज्याच्या पोलिस खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’ ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तीन टप्प्यांत होणाऱ्या या यात्रेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित पोलिसांनी प्रत्येकी आठ-आठ दिवसांसाठी विविध जिल्ह्यांत जाऊन कार्यकर्त्यांच्या वेशात बंदोबस्त केला. महाजनादेश यात्रेला सुरुवात होताना प्रत्येक जिल्हा आणि शहर पोलिस दलातून कर्मचारी पाठविण्यात आले होते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. ही यात्रा ज्या जिल्ह्यात किंवा शहरात जाईल तेथे सामान्य पेहराव करून पोलिस सहभागी होत होते. पुण्यातील ‘महाराष्ट्र इंटलिजन्स अॅकॅडमी’त त्यासाठी पोलिसांचे चार-चार दिवसांचे खास प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. या प्रयोगांतून मुख्यमंत्री फडणवीस यांची सुरक्षा अभेद्य ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, तरीही शेतकऱ्यांच्या फसवणुकीप्रकरणी गाजत असणाऱ्या कडकनाथ कोंबडी प्रकरणात सांगली आणि इस्लामपूरमध्ये यात्रेच्या रथावर अंडी आणि कोंबड्या फेकण्याची घटना घडली. तेव्हा काही क्षणात तेथे दाखल झालेले आणि पक्षाचे भासणारे कार्यकर्ते देखील पोलिस असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. राज्याच्या मुखमंत्र्यासह नागरिकाच्या सुरक्षेसाठी पोलिस कायमच तत्पर असतात. परंतु, पक्षीय प्रचारासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी काढलेल्या यात्रेसाठी राज्यभर पोलिस कार्यकर्त्यांच्या वेशात राबल्याने आता वादाला तोंड फुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.