जळगाव (प्रतिनिधी) पावसाळा सुरु झाल्यानंतरही जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण समस्या उग्ररूप धारण करून आहे. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर विधानसभा मतदार संघच सर्वाधिक जलसंकटात असल्याची धक्कादायक माहिती शासकीय आकडेवारीतून समोर आली आहे.
जळगाव जिल्हा तसा अवघ्या महाराष्ट्रात वाढीव तापमानासाठी कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे जळगावात पाण्याची टंचाई असणे स्वाभाविक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी बारा तालुक्यांतील २४७ गावांत २१८ टँकरने पाणीपुरवठा सुरु असल्यामुळे जिल्ह्यावर जलसंकट असल्याचे चित्र स्पष्ट आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातील असल्यामुळे जलसंकटाचे गांभीर्य अधिकच वाढते. जर जलसंपदा मंत्र्यांचा जिल्हा आणि विधानसभा मतदार संघच तहानलेला असेल तर, राज्याची स्थिती काय असेल? असा प्रश्न उपस्थितीत होणे,स्वाभाविक आहे.
जिल्ह्यातील तीन तालुके वगळता पाणीटंचाईची गंभीर स्थिती कमी-जास्त प्रमाणात सगळीकडे सारखीच आहे. परंतू सर्वात गंभीर परिस्थिती ना.गिरीश महाजन यांच्या तालुक्यात आहे. जामनेरमधील ४२ गावांमध्ये ४४ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येतोय. त्यामुळे खुद्द्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील पाणीबाणी स्थिती पावसाळा सुरु होऊन देखील कायम आहे. विशेष म्हणजे जामनेर तालुक्यातच सर्वाधिक विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. जामनेरमधील ५४ गावांपैकी ५३ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे यावल व रावेर तालुक्यात आजच्या घडीला एकही गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरु नाहीय.
तालुकानिहाय टँकरने पाणीपुरवठ्याची आकडेवारी
जळगाव : गावं : ९ टँकर : १०
जामनेर : गावं : ४२ टँकर : ४४
धरणगाव : गावं : ४ टँकर : ४
एरंडोल : गावं : ०१ टँकर : ०३
भुसावळ : गावं : ०६ टँकर : ०७
यावल : गावं : ०० टँकर : ००
रावेर : गावं : ०० टँकर : ००
मुक्ताईनगर : गावं : ०१ टँकर : ०१
बोदवड : गावं : ०९ टँकर : ०८
पाचोरा : गावं : २९ टँकर : २३
चाळीसगाव : गावं : ३९ टँकर : ४५
भडगाव : गावं : १० टँकर : ०८
अमळनेर : गावं : ५४ टँकर : ३६
पारोळा : गावं : ४३ टँकर : २९
चोपडा : गावं : ०० टँकर : ००
एकूण : गावं : २४७ टँकर : २१८
तालुकानिहाय विहीर अधिग्रहणची आकडेवारी
जळगाव : गावं : ५ विहीर : ०५
जामनेर : गावं : ५४ : विहीर ५३
धरणगाव : गावं : ३६ विहीर : ३६
एरंडोल : गावं : १७ विहीर : १७
भुसावळ : गावं : १५ विहीर : १९
यावल : गावं : ०५ विहीर : ०५
रावेर : गावं : ०५ विहीर : ०५
मुक्ताईनगर : गावं : ३० विहीर : ३०
बोदवड : गावं : १७ विहीर : १७
पाचोरा : गावं : ३० विहीर : ३०
चाळीसगाव : गावं : २५ विहीर : २६
भडगाव : गावं : ०५ विहीर : ०५
अमळनेर : गावं : ३९ विहीर : ४१
पारोळा : गावं : १४ विहीर : १४
चोपडा : गावं : ०७ विहीर : ०८
एकूण : गावं : ३०३ विहीर : ३१०