नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने गेल्या महिन्यात दोन लसी घेण्यासाठी अंतर वाढविण्याचे जाहीर केले असले तरी आपण अशी शिफारस केलीच नसल्याचा दावा वैज्ञानिकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे अंतर वाढविण्याचा निर्णय झाला तरी कसा ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशात कोरोनावर परिणामकारक ठरणार्या लसीचे लसीकरण सुरू झालेले आहे. या अनुषंगाने सरकारने कोव्हिशिल्ड लसीच्या पाहिल्या आणि दुसर्या डोसमधील अंतर ४ ते ६ आठवडे असावे असे जाहीर केले होते. त्यानंतर पुन्हा गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित केले. हा निर्णय लसींच्या तुटवड्यमुळे नसून तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे, असं केंद्राकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
सरकारच्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. यातच आता केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन मधील काही वैज्ञानिकांनी, दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती, असा धक्कादायक दावा केला आहे. तसेच या निर्णयाला, आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा या गटातल्या तीन सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.