जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्नी माहेरी निघून गेल्याने निर्माण झालेल्या मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील एका ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विषबाधेमुळे प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
समाधान संतोष पाटील (वय ३७, रा. नाचनखेडा, ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. नाचनखेडा येथे राहणारा समाधान हा पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. प्लंबरचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती घरी परतत नव्हती. या कारणामुळे समाधान पाटील हे मोठ्या मानसिक तणावाखाली होते.

दरम्यान, याच विवंचनेतून १२ नोव्हेंबर रोजी समाधान यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. प्रकृती खालावताच त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पाटील कुटुंबीय आणि नाचनखेडा गावावर शोककळा पसरली आहे. समाधान यांचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे या घटनेचा पुढील प्राथमिक तपास करीत आहेत.



