Home क्राईम धक्कादायक : कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीवर चाकूहल्ला; डोळ्यात फेकली मिरची पूड

धक्कादायक : कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीवर चाकूहल्ला; डोळ्यात फेकली मिरची पूड


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय नगर परिसरातील एका पतीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले आहे. क्रूरतेची सीमा ओलांडत संशयित आरोपीने पत्नीच्या तोंडावर आणि डोळ्यात मिरचीची पूड फेकून तिला असह्य यातना दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनल दीपक लोंढे आणि तिचे पती दीपक बुधा लोंढे हे धरणगावमधील मरीमाता मंदीर परिसरातील संजय नगर भागात वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये सातत्याने घरगुती कारणावरून खटके उडत होते. बुधवारी ८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास या वादाने रौद्र रूप धारण केले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर, रागाच्या भरात असलेल्या दीपकने घरातील धारदार चाकूने सोनल यांच्यावर सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता, त्याने पत्नीचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी तिच्या डोळ्यात आणि तोंडावर मिरचीची पूड फेकली.

या हल्ल्यात सोनल लोंढे या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच विवाहितेची आई जिजाबाई पंडित पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी सोनल यांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून संशयित आरोपी पती दीपक लोंढे याला ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound