गोंदिया (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेरठ आणि वर्धा येथील सभेत गर्दी न झाल्याने भाजपाची चांगलीच नाचक्की झाली होती. दुसरीकडे बुधवारी गोंदियात मोदींच्या सभेसाठी पैसे देऊन जमा करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. सभेसाठी आलेल्या लोकांनी आम्हाला १०० रुपयांपासून ते प्रति गाडी ५०० रुपयांपर्यंत पैसे देण्यात आल्याचे कॅमेऱ्या समोर मान्य केले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा भाजपची चांगलीच नाचक्की झालीय.
एका दैनिकाने केलेल्या पाहणीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियात बुधवारी सभा घेतली. मेरठ आणि वर्धा येथील मोदींच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्यानंतर गोंदियातील सभेत भाजपाने गर्दी जमवण्याकडे विशेष लक्ष दिले होते. त्यानुसार सिग्नल टोळी या गावातील काही महिलांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया दिली आहे. १५० रुपये मिळाल्याचे या महिलांनी मान्य केले आहे. अनेकांनी खासगीत बोलताना पैसे मिळाल्याचे मान्य केले. काहींनी एका गाडीमागे ५०० रुपये मिळाले. हे पैसे नाश्ता आणि पाण्यासाठी देण्यात आले. उर्वरित पैसे नंतर मिळतील, असे सांगितले. पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला,असे ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पाहणीतून समोर आले आहे.