मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय नर्स तरुणीवर पाच महिने अत्याचार केल्याचा धक्कादायक बाब समोर आलीय. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरूणाविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, अमरावती शहरातील ३१ वर्षीय तरुणी एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘हॅलो यू ॲप’च्या माध्यमातून तरूणीची मुक्ताईनगर येथील भूषण संजयराव तायडे (वय-३१) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेमात रूपांतर झाले. याचा गैरफायदा घेत भूषण तायडे याने तरुणीला २३ एप्रिल २०२१ रोजी गाडी पाठवून तरूणीला मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. त्यानंतर एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पिडीत तरुणीसोबत भूषण तायडे हा त्याच्या घरी आला असता त्याच्या घरच्यांनी लग्नास विरोध केला. यामुळे भूषण तायडे आणि पीडित तरुणी हे अमरावती येथे २४ एप्रिल २०२१ ते ८ सप्टेंबर २०२१ दरम्यान एकाच ठिकाणी राहू लागले. त्यावेळी सुद्धा तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तरुणीने लग्न संदर्भात विचारले असता कागदपत्रांचा बहाण केला आणि गोष्ट टाळली. त्यानंतर अचानक भूषण तायडे हा तरुणीला काहीही न सांगता ८ सप्टेंबर रोजी रात्री घरातून निघून गेला. दरम्यान पीडिता ही भूषण तायडे याच्या घरी गेली असता भूषणच्या आई वडीलांनी पिडीतेला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीने अमरावती शहरातील फैजरपुरा शहर पोलीस स्टेशनला धाव घेऊन संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.