Home क्राईम धक्कादायक: आधी बंधाऱ्यावरून ढकलले, मग गळा दाबून संपवले ; व्यसनी भावाचा करुण...

धक्कादायक: आधी बंधाऱ्यावरून ढकलले, मग गळा दाबून संपवले ; व्यसनी भावाचा करुण अंत


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू आणि गांजाच्या नशेपायी कुटुंबाला सतत त्रास देणाऱ्या भावाचा, संतापाच्या भरात सख्ख्या भावानेच खून केल्याची खळबळजनक घटना चोपडा तालुक्यातील नारोद येथे उघडकीस आली आहे. २० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडलेला हा प्रकार २२ मार्चच्या सकाळी समोर आला असून, याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत रोहन पानाचंद पाटील (वय २३) हा आपली आई, भाऊ सुनील आणि वहिनीसोबत राहत होता. रोहनला दारू आणि गांजाचे तीव्र व्यसन होते. या नशेच्या धुंदीत तो घरात सतत आई राधाबाई आणि भाऊ सुनील यांना त्रास द्यायचा. शुक्रवारी, २० मार्च रोजी त्याने जुगार खेळण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने संतापलेल्या रोहनने घरातील सदस्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

रागाच्या भरात घेतला टोकाचा निर्णय :
भावाच्या सततच्या त्रासाला कंटाळलेला सुनील पाटील याने रात्री ११ वाजेच्या सुमारास रोहनला समजावण्याच्या बहाण्याने गावाजवळील गुळ नदीवरील केटी बंधाऱ्यावर नेले. तिथे वादावादी दरम्यान सुनीलने रोहनला बंधाऱ्यावरून खाली ढकलून दिले. एवढ्यावरच न थांबता, सुनीलने खाली जाऊन रोहनचा गळा दाबला आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली.

पोलिसी कारवाई :
दोन दिवसांनंतर ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. नातेवाईकांच्या संशयानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. अखेर आई राधाबाई पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुनील पाटील याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी प्रमोद वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound