पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील खराडी भागात घडली आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
मात्र, महिला घरात पळून गेल्याने अनर्थ टळला आहे. पार्किंगच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला आहे. १० ते १५ जणांच्या टोळक्याने हा संपूर्ण प्रकार केला असल्याची माहिती समोर आली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी काही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजे व याप्रकरणी आरोपी हे एकाच परिसरात राहतात. त्या दोघांमध्ये पार्किंग वरून वाद सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद विकोपाला गेला आणि १३ जणांनी येऊन फिर्यादी यांची एक चारचाकी गाडी फोडून नुकसान केले.हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
त्याठिकाणी असलेल्या एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली. फिर्यादी यांची भाडेकरू महिला देखील त्या ठिकाणी असल्यामुळे तिच्या अंगावर आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने तेथून पळ काढल्यामुळे अनर्थ टळला आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.