धक्कादायक ! मोरोक्कोत मारले जाणार ३० लाख कुत्रे

रबात-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मोरोक्कोने ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयावर आता जगभरातून टीका होऊ लागली आहे. २०३० साली होणारा फिफा फुटबॉल विश्वचषक मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल देशांत खेळला जाणार आहे. जगातील फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून याकडे पाहिले जाते. कोट्यवधी क्रीडाप्रेमी हे सामने पाहायला येत असतात. या पार्श्वभूमीवर मोरोक्कोने देशात स्वच्छतेचे अभियान राबविले आहे. मात्र यासाठी त्यांनी ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मोरोक्कोवर जगभरातून टीका होऊ लागली आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मोरोक्कोचे अधिकारी अमानवीय आणि बेकायदेशीर पद्धतींचा वापर करत आहेत. विषारी इंजेक्शन देणे, सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालणे आणि गोळ्या घालून वाचलेल्या कुत्र्यांना फावड्याचे घाव घालत जीवे मारणे.. अशा प्रकारच्या पद्धती अवलंबण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्राणी हक्क संस्थेकडून या घटनेचा विरोध करण्यात येत आहे. प्राणी हक्काची वकिली करणारे जेन गुडॉल हे पुढे आले असून त्यांनी फिफाला पत्र लिहून या विषयात लक्ष घालण्यास सांगितले आहे. फिफाला लिहिलेल्या पत्रात गुडॉल म्हणाले, मोरोक्को प्रशासनाचा निर्णय ऐकून मी हैराण झालो. काही अहवालानुसार असाही दावा केला जात आहे की, मोरोक्कोच्या प्रशासनाने काही ठिकाणी हजारो कुत्र्यांना मारले आहे. विश्वचषक जसा जवळ येत जाईल, तशी ही संख्या आणखी वाढू शकते. प्राणी संघटनांनी आवाज उचलून मोरोक्कोच्या निर्णयावर टीका केली असली तरी याबाबत अद्याप मोरोक्को सरकार किंवा फिफा संघटनेकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही

Protected Content