भाजपला धक्का; उदगीरचे माजी आमदार तुतारी हाती घेणार

लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार दणका दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपला धक्के देण्याची मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिवसंकल्प दौऱ्यात माजी उपमहापौर आणि काही नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी भाजपला धक्का दिला. आता शरद पवारांकडून भाजपला मराठवाड्यात दुसरा दणका बसणार असल्याचे समजते.

माजी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा येत्या 11 जुलै रोजी आपल्या मोजक्या समर्थकांसह मुंबईत शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीतून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विनायकराव पाटील यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये झालेला आहे. लातूर जिल्ह्यात भाजपाचे दोन माजी आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे.

Protected Content