नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपमध्ये आता उलटी गंगा वाहायला सुरुवात झाली आहे. लोकसभेतील पराभवानंतर भाजपला पहिला झटका बसला आहे. भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी आमदार रमेश कुथे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रमेश कुथे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कुथे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यामुळे कुथे यांचा कल काँग्रेसकडे असल्याचं सांगितलं जात आहे.
रमेश कुथे हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी भाजपला रामराम केला आहे. रमेश कुथे हे पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेतून ते दोनदा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते पूर्ण केलं नाही, असं सांगतानाच पक्षात आलेल्या नवीन लोकांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप माजी आमदार रमेश कुथे यांनी केला आहे.
नागपूरमध्ये देशपांडे सभागृहात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण झाले. पूर्व विदर्भाच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बावनकुळे यांनी आमच्याकडे लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं सांगितलं. आमच्याकडे अनेक जण येत आहेत. त्यांच्या मागण्याही घेऊन येत आहेत. त्यामुळे जे येतात त्यांना हो बोलतो. जे काही मागतात त्यांनाही हो बोलतो. पण आपण काही सर्वांना खूश करू शकत नाही. म्हणूनच आपल्याकडे येतील 100 आणि परत जातील पाच. पण पाच गेले तरी आपण 95 प्लस राहू, असं बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळे यांचं हे भाषण ऐकल्यानंतर पक्षात आपली काही गरज नाही याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्याला मूर्ख बनवलं गेलं आहे. तेव्हाच पक्ष सोडण्याचा विचार मनात आला आणि तो दिवस काल उगवला, असं कुथे म्हणाले.