नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना आमदार नरहरी झिरवळ यांनी पाठिंबा दिला आहे. झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी अचानक ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे नरहरी झिरवाळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना आपला जाहीर पाठींबा असल्याची घोषणाच नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. कौटुंबिक संबंधांमुळे संदीप गुळवेंना जाहीर पाठींबा देत असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी झिरवाळ यांनी गुळवेंना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी नरहरी झिरवाळ म्हणाले, ”नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेतर्फे किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संदीप गुळवे हे काँग्रेसमधून नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून ते निवडणूक लढवत आहेत. शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून गुळवे यांना पाठिंबा देत आहे”, असे नरहरी झिरवाळ म्हणाले.