काँग्रेसला दे धक्का !.. माजी जिल्हाध्यक्षांच्या हाती ठाकरेची मशाल

अहिल्यानगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अहिल्यानगरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अखेर आज, रविवारी २३ फेब्रुवारी रोजी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. पक्षप्रवेशानंतर त्यांनी अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाची मशाल पेटवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर नवी ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे.

किरण काळे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “मी अहिल्यानगरमधून आलो असून, मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मातोश्रीवरून हिंदुत्वासाठी आवाज उठवला, त्याच ठिकाणी येऊन मी संघर्षाची वाट स्वीकारली आहे. अनेक नेते सत्ता मिळवण्यासाठी पक्ष बदलत आहेत. मात्र, मी कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर नव्हे, तर पडत्या काळात हा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहून लढण्याचा निश्चय केला आहे.”

स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याचे स्पष्ट करताना किरण काळे म्हणाले, “अहिल्यानगरमध्ये काही लोक हिंदुत्वाचा अपप्रचार करत आहेत. आम्ही शिवसेनेच्या विचारसरणीचे खरे वारसदार आहोत. शिवजयंतीच्या रॅलीत लॉरेन्स बिश्नोईच्या प्रतिमा झळकल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला. हे आम्ही सहन करणार नाही. हिंदुत्वाची मशाल पुन्हा पेटवण्यासाठी आम्ही ठाकरे गटात सामील झालो आहोत. आगामी काळात अहिल्यानगरमध्ये शिवसेनेला अधिक बळकट करण्याचे आमचे ध्येय आहे.”

किरण काळे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील महिन्यात 13 माजी नगरसेवकांसह 40 पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले होते, तसेच काही पदाधिकारी भाजपच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीत किरण काळे यांचा ठाकरे गटात प्रवेश हा पक्षासाठी सकारात्मक मानला जात आहे. “आम्ही कोणावरही नाराज नाही, हा प्रवेश नाराजीपोटी नाही. आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुत्वाच्या खऱ्या विचारांसाठी आम्ही लढणार आहोत,” असे किरण काळे यांनी स्पष्ट केले.

Protected Content