शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शेंदुर्णी येथे शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक जिवंत देखाव्यांची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. विविध देखावे, पारंपरिक सादरीकरणे आणि शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गाव शिवमय वातावरणाने दुमदुमून गेले.
मिरवणुकीची सुरुवात धी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांच्या निवासस्थानापासून करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजमाता जिजाऊ, अष्टप्रधान मंडळ, शिवरायांच्या अर्धांगिनी, भालदार, मावळे तसेच स्काऊट गाईड पथक यांच्या जिवंत देखाव्यांनी उपस्थितांना शिवकालीन इतिहासाची अनुभूती दिली. लेझीम पथकाच्या जोशपूर्ण सादरीकरणाने वातावरणात उत्साह निर्माण झाला, तर जनजागृतीपर पथनाट्याने सामाजिक संदेश दिला.

गावातील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करत ही मिरवणूक गांधी चौकात पोहोचली. येथे विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे करत उपस्थितांना प्रेरित केले. पालखीत विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. गरुड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे दमदार सादरीकरण केले, तर गरुड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अश्वारूढ शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमासाठी शिवशंभू प्रतिष्ठानचे स्नेहदीप गरुड, दिग्विजय सूर्यवंशी आणि करूण सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास संजयदादा गरुड, सरोजिनीताई गरुड, नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष शरद बारी, शांताराम गुजर, शिवराज गरुड, महेश भदाणे, विलास अहिरे, अॅड. देवेंद्र पारळकर, अतुल बारी, नितीन भिसे, संतोष महाले, प्राचार्य भोळे सर, प्रा. साळुंखे, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, उपमुख्याध्यापक बी. एम. कुमावत, पर्यवेक्षक जे. एस. जुबंळे, मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड, मनोज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shivshambhu Pratishthan’s grand Shiv Jayanti procession; Shivkaal stood out with lively scenes



