जळगाव (प्रतिनिधी) खामगावकडून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बसला लाल रंगाच्या अज्ञात आयशर ट्रकने आज सकाळी आयोध्यानगर जवळील हॉटेल कमल पॅराडाईज जवळ जोरदार धडक दिली. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात आयशर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, खामगाव नाशिक ही शिवशाही बस क्रमांक (एमएच 19 बीई 1226) ही आज सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगाव शहरात येत होती. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या आयोध्यानगर जवळ कमल पॅराडाईज समोर अज्ञात लाल रंगाच्या आयशर ट्रकने समोरासमोर जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, शिवशाही बस समोरील काच व दरवाजा याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सोबत बाजूला असलेल्या एमएसईबीच्या तारा देखील तुटून पडल्या आहेत. अपघात झाल्यानंतर आयशर ट्रक चालक ट्रकसह फरार झाला आहे. याबाबत शिवशाही ट्रकचालक गजानन तुकाराम चव्हाण (रा.पाथर्डी ता.मेहकर जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.