मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जर आपल्याला उपमुख्यमंत्रीपद मंजूर होते तर २०१९ साली अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला नाकारत युती का तोडली ? असा सवाल आज शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखात काल झालेल्या शपथविधीवर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरविलेल्या सैन्याने उघड केले, पण पक्ष बदलण्याची व फुटीरतेला उत्तेजन देण्याची प्रक्रिया राजभवनात चालणार आहे का? महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करणार्यांना घटनेचे रखवालदार राजभवनावरून ताकद कशी देऊ शकतात? लोकनियुक्त विधानसभेचे हक्क आमची न्यायालये व राज्यपाल कसे काय उद्ध्वस्त करू शकतात? या प्रश्नांची उत्तरे इतकी धूसर कधीच झाली नव्हती. पण आता उत्तरे कोणालाच नकोत. सत्ता हेच सगळ्या प्रश्नांचे उत्तर बनले असल्याची टीका यात करण्यात आली आहे.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असे सांगणार्यांनीच मुख्यमंत्रीपदाचा मुकुट स्वतःवर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर. म्हणजे शिवसेनेविषयीची नाराजी वगैरे हा सगळा बनाव होता. आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?, असा प्रश्न या अग्रलेखात विचारण्यात आलेला आहे.