जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा जागृत जनमंचने आज एका पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदार संघातील उमेदवार म्हणून शिवराम पाटील यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की, सुरेश जैन यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची तयारी चालवली आहे. पण सुरेश जैन यांच्यामुळे आज जळगाव शहर गहाण पडले आहे. त्यांनी जळगावात औद्योगिक विकास होवू दिला नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा आपला लोक प्रतिनिधी करणे, अयोग्य आहे. त्याचवेळी गेल्या निवडणुकीत जळगावकरांनी संधी दिलेले आ. सुरेश भोळे हेही कुठलीही ठोस भूमिका घेण्यात अपयशी ठरले आहेत, त्यांना स्वत:चे मत नाही, त्यांच्याकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे, म्हणून यावेळी मंचने धडाडीचे व्यक्तिमत्व असलेल्या शिवराम पाटील यांना जळगावातून आमदारकीसाठी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.