जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जुने जळगाव परिसरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या जय हनुमान सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे यावर्षी शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर भरीतपुरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.

शिवपुराण कथेच्या निमित्ताने अनेक भाविकांनी दररोज कथाश्रवणाचा लाभ घेतला. धार्मिक प्रवचनांमधून शिवभक्ती, नैतिकता आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. काल्याच्या कीर्तनानंतर पारंपरिक पद्धतीने भरीतपुरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. महाप्रसाद वितरणावेळी शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावाचे दर्शन घडले.

या संपूर्ण उपक्रमासाठी जुने जळगाव मित्र मंडळ आणि जय हनुमान सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वयंस्फूर्तीने सेवा करत होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास ललित चौधरी उर्फ भैया भाऊ, हरीश कोल्हे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास अधिकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आयोजकांनी सर्व उपस्थित भाविकांचे आभार मानत, पुढील काळातही अशा धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.



