जळगाव प्रतिनिधी । गत अनेक दिवसांपासून चर्चेत असणार्या शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या पाडण्यासाठी अखेर मुहूर्त लाभला असून ५ फेब्रुवारीपासून याला पाडण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.
रेल्वे प्रशासनातर्फे शिवाजी नगर उड्डाण पुल ५ फेब्रुवारी तोडण्यात येणार आहे. यासाठी शास्त्री टावर आणि शिवाजी नगर या दोघीबाजूची पादचारी व वाहन वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या पुलाचे पाडकाम करण्यास महापालिका आयुक्तांनी मंजूरी दिली आहे. रेल्वे प्रशासानातर्फे जळगाव ते भुसावळ दरम्यान नवीन ४ थी लाईन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येत असल्याने शिवाजी नगर उड्डाण पुल तोडून तेथे नवीन पुल बांधण्यात येणार आहे. परिणामी, पुलाच्या दोन्ही बाजूची पादचारी व वाहन वाहतूक १ फेब्रुवारी २०१९ पासून थांबविण्याचे यावी असे पत्र महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. हा मार्गं १ फेब्रुवारीपासून नवीन उड्डाण पुल तयार होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे उल्लेख पत्रात करण्यात आलेला आहे. मनपा प्रशासनाकडून वाहतूक शाखेला पत्र पाठविण्यात येणार आहे व शिवाजीनगर रेल्वे पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच पर्यायी रस्ता म्हणून ही वाहतूक शिवाजी नगर दूध फेडरेशन समोरील रेल्वे गेटमार्गे पिंप्राळा रेल्वे गेट व रिंगरोडवरुन वळविण्यात आली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरून रस्ता सरळ नागरीवस्तीत पूल उतरवून तो यु-टर्न करून ममुराबाद रस्त्याला जोडण्यास शिवाजी नगरवासीयांनी आक्षेप घेतला आहे. याऐवजी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर वाय आकाराचा पूल उभारून एक दूध फेडरेशनकडे, तर दुसरा रेल्वेमार्गाच्या बाजूने थेट ममुराबाद रस्त्याला सरळ रस्ता जोडावा, अशी मागणी प्रशासनाकडे त्यांनी केली होती. मात्र या मागणीला प्रतिसाद न देता शिवाजीनगर पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.