श्री शिवमहापूराण कथेत आज शिव पार्वती विवाह सोहळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माणसांमध्ये जो पर्यंत राग, द्वेष, मत्सर, वैराग्य, अपमान आणि हिंसा या सारख्या वृत्ती सोडायला हव्या. या पासून मुक्त होण्यासाठी भगवंतांची भक्ती आणि ध्यान आवश्यक आहे. भगवान शिव म्हणतात की, माणसांमध्ये मन जास्त सक्रिय असल्याने त्याला माणूस म्हटले गेले आहे. कारण माणूस नेहमीच आपल्या मनाच्या ताब्यात असतो, असे प्रतिपादन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी केले.

जळगाव शहरातील तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी २५ डिसेंबर रोजी भाविकांच्या उत्साहात श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला. ही कथा ३१ डिसेंबरपर्यंत असून १ जानेवारी रोजी सकाळी गोपाळकाल्याचे किर्तन होऊन समारोप होणार आहे. कथा दुपारी १ वाजेपासून हभप देवदत्त महाराज मोरदे हे सांगत आहेत.

शिवपुराणात शिवाच्या कल्याणकारी स्वरूपाचे तत्त्वात्मक विवेचन, रहस्य, महिमा आणि उपासना यांचे तपशीलवार वर्णन आहे. शिवपुराणात, पंचदेवांमध्ये शिव हे अनादी सिद्ध परमेश्वर म्हणून स्वीकारले गेले आहेत. शिव-महिमा, लीला-कथांव्यतिरिक्त, त्यात उपासना-पद्धती, अनेक जाणकार कथा आणि शिक्षण देणार्‍या कथांचा सुंदर मिलाफ आहे. कथेसाठी शंभू सुतार, कैलास परदेशी, नितीन पाटील, प्रकाश आहिरे, सोपान पाटील हे संगीत साथ करीत असून त्यामुळे कथेत रंगत निर्माण झाली आहे.

श्री शिवमहापूराण कथेत शुक्रवारी २९ रोजी श्री शिव पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त सजीव आरास करण्यात येणार आहे. तरुण कुढापा मंडळातील  कार्यकर्ते यात सहभागी होतील. सर्व देवी देवता तसेच शिव लग्नाच्या वरातीतील भुतांचा नृत्याचा देखावा यात दाखवण्यात येईल.  शिव पार्वती विवाह सोहळ्याची कथा व सजीव आरास संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे.

Protected Content