Home Cities जळगाव जळगावात शिवजन्मोत्सवाचा सोहळा : रॅली, पारंपरिक नृत्य आणि सजीव देखाव्यांनी अवघी नगरी...

जळगावात शिवजन्मोत्सवाचा सोहळा : रॅली, पारंपरिक नृत्य आणि सजीव देखाव्यांनी अवघी नगरी दुमदुमली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जळगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आणि जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने संपूर्ण शहरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली होती. सकाळपासूनच शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी उसळली होती.

भव्य रॅली आणि मान्यवरांची उपस्थिती :
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून या भव्य रॅलीला दिमाखात सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. रॅलीच्या संपूर्ण मार्गावर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

आदिवासी नृत्य आणि महापौरांचा सहभाग :
यावर्षीच्या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी बांधवांनी सादर केलेले त्यांचे पारंपरिक नृत्य. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या नृत्यातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, या नृत्याचा आनंद लुटताना महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्वतः आदिवासी बांधवांसोबत नृत्यात सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर, तरुणींनी सादर केलेल्या लेझीम पथकामध्येही महापौरांनी लेझीमचा ठेका धरत उपस्थितांचा उत्साह वाढवला.

सजीव देखावे आणि विद्यार्थ्यांची शिस्त :
रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला होता. अनेक तरुणींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले, तर काही तरुणांनी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांनी देखील अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग नोंदवला. हातामध्ये भगवे ध्वज आणि मुखात शिवरायांचा जयघोष अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या चरणी मानवंदना अर्पण केली.

शस्त्र प्रदर्शन आणि शिवप्रेमींची गर्दी :
ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीमध्ये शहरातील सर्व थरातील लोक एकत्र आले होते. याच निमित्ताने जळगाव शहरातील जीएस मैदान येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने भव्य शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी तरुणांची आणि अभ्यासकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण जळगाव शहर आज भगवेमय झाले असून, सर्वत्र शिवविचारांचा जागर पाहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound