Home प्रशासन नगरपालिका मोकाट गुरांचा उपद्रव व अस्वच्छतेविरोधात शिवसेनेचे नगर परिषदेला निवेदन

मोकाट गुरांचा उपद्रव व अस्वच्छतेविरोधात शिवसेनेचे नगर परिषदेला निवेदन


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील वाढती अस्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट गुरांचा धोका यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने यावल नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अपुऱ्या स्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून मोकाट जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने, या समस्येकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे, असे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावल नगर परिषद कार्यक्षेत्रातील विविध भागांमध्ये सध्या स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यांवर साचलेले घाण पाणी आणि त्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि चौकाचौकांत पसरलेली अस्वच्छता हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

याशिवाय, शहरातील रस्त्यांवर आणि राज्य महामार्गावर मोकाट गुरांचा वाढता वावर हा देखील गंभीर समस्या बनली आहे. ही जनावरे रस्त्याच्या मध्यभागी टोळक्याने बसत असल्यामुळे दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांना अडथळा निर्माण होतो. अनेक वेळा अचानकपणे समोर येणाऱ्या जनावरांमुळे अपघातही होत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रशासनाने स्वच्छता मोहीम तातडीने राबवावी आणि मोकाट गुरांचा बंदोबस्त करून सार्वजनिक आरोग्य व वाहतुकीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजय तायडे, नाना महाजन, पंकज तायडे, राजू सपकाळे, चेतन सपकाळे आणि सागर कोळी उपस्थित होते. हे निवेदन नव्याने नियुक्त बांधकाम व नोडल अधिकारी संग्राम शेळके यांना देण्यात आले.

शहरातील अस्वच्छता आणि मोकाट गुरांचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून प्रशासनाने वेळेवर योग्य निर्णय न घेतल्यास जनतेत असंतोष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या या मागणीमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, येत्या काही दिवसांत कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Protected Content

Play sound