जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीच्या शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी अत्यंत आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. बुधवारी, ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता परिसरातील आराध्य दैवत दत्त मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा अधिकृत नारळ फोडण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी न्हाऊन निघाला होता.
दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन :
या प्रचार रॅलीमध्ये प्रभाग ११ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, सिंधुताई विजय कोल्हे, संतोष सोनवणे आणि माजी महापौर ललित कोल्हे यांच्या प्रतिनिधींनी आपले शक्तीप्रदर्शन केले. याप्रसंगी माजी महापौर सिमाताई भोळे, माजी आमदार लताताई सोनवणे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सरिता कोल्हे, पियुष कोल्हे, रेखा पाटील, जितू बारी यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने आणि ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले.

डॉ. अमृता सोनवणे यांची मतदारांशी भावनिक संवाद :
प्रचार रॅली दरम्यान डॉ. अमृता सोनवणे यांनी घरोघरी जाऊन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेतल्या. विशेषतः वृद्धांचे पाय धरून त्यांनी आशीर्वाद घेतले, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. “आम्हाला सेवेची संधी दिल्यास या परिसराचा संपूर्ण कायापालट करू आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमचा मार्गी लावू,” असा शब्द डॉ. सोनवणे यांनी यावेळी मतदारांना दिला. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून आणि फुले उधळून स्वागत केले, ज्यामुळे उमेदवारांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
मार्गावर भगवेमय वातावरण :
किसनराव नगरातील दत्त मंदिरातून सुरू झालेली ही रॅली साई संस्कार कॉलनी, राजीव गांधी नगर, गुलमोहर हाऊसिंग सोसायटी, विशाल कॉलनी, श्रीधन नगर, व्यंकटेश नगर, मुकुंद नगर, सागर टेन्ट हाऊस, रुक्मिणी नगर, अर्जुन नगर आणि जिजामाता शाळा परिसर अशा विविध भागांतून काढण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘शिवसेना अंगार आहे’ अशा घोषणांनी संपूर्ण प्रभाग दुमदुमून गेला होता. या रॅलीतील महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती ही महायुतीसाठी जमेची बाजू मानली जात आहे. एकूणच, प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलची चर्चा आता जोमाने सुरू झाली आहे.



