Home राजकीय मुंबईत शिवसेनेचा महापौर? शिंदेंची रणनीती की दबावतंत्र; निकालानंतर भाजपची डोकेदुखी वाढली

मुंबईत शिवसेनेचा महापौर? शिंदेंची रणनीती की दबावतंत्र; निकालानंतर भाजपची डोकेदुखी वाढली


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर सत्तास्थापनेचे राजकारण रंगात आले असून, महापौरपदावरून महायुतीतच तणाव निर्माण झाला आहे. सर्वाधिक ८९ जागा जिंकून भाजप मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अपरिहार्य गरज भासणार आहे. याच राजकीय गणितातून आता मुंबईत शिवसेनेचाच महापौर असावा, अशी मागणी शिंदे गटाकडून पुढे येऊ लागल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी भाजप-शिंदेसेना महायुतीला एकूण ११८ जागा मिळाल्या असून बहुमतापेक्षा अवघ्या चार जागांचा काठावरचा फरक आहे. भाजपला ८९ जागा मिळाल्या असल्या तरी शिंदेसेनेच्या २९ नगरसेवकांशिवाय सत्ता स्थापन करणे कठीण आहे. त्यामुळेच सत्तेच्या या नाजूक समीकरणात एकनाथ शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असावा, अशी जोरदार मागणी शिंदे गटातील नगरसेवकांनी केली आहे. मुंबई हा शिवसेनेसाठी केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक विषय राहिला असून गेल्या २५ वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेचाच महापौर होता. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच भाजपचा महापौर मुंबईत विराजमान होण्याची शक्यता असतानाच शिंदे गटाने महापौरपदावर दावा ठोकल्याने सत्तेच्या वाटाघाटींना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना मुंबईतील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढील तीन दिवस हे नगरसेवक हॉटेलमध्येच मुक्कामी राहणार असून, आज होणाऱ्या बैठकीत शिंदे त्यांना पुढील रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे “तयारीनिशी या” असे आदेश नगरसेवकांना देण्यात आल्याने ही केवळ बैठक नसून, भाजपसोबतच्या वाटाघाटींचा भाग असल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही जागावाटपाच्या वेळी एकनाथ शिंदे भाजपवर वरचढ ठरले होते. सुरुवातीला भाजप शिंदेसेनेला ४० ते ५० जागा देण्याच्या भूमिकेत होता, मात्र शिंदेंच्या ठाम भूमिकेमुळे अखेर महायुतीत शिंदेसेनेच्या वाट्याला सुमारे ९० जागा आल्या होत्या. आता निकालानंतर सत्तेचे गणित जुळवताना शिवसेनेचे स्थान काय असावे, यावर भाजप आणि शिंदे गटात पुन्हा एकदा जोरदार वाटाघाटी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांकडून मात्र संयमित प्रतिक्रिया दिली जात आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, महायुतीत मागण्या होत असतात, मात्र महापौरपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा करून घेतला जाईल. सत्तेत कोण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहे यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. मुंबईतील सत्ता स्थापनेसाठी एकत्र बसून चर्चा होईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एकनाथ शिंदे दबावतंत्र वापरतील, असे वाटत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound