जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. गौरव सोनवणे यांच्या पाठोपाठ जळगाव महापालिकेत शिवसेनेचे मनोज चौधरी यांची देखील बिनविरोध निवड झाली असून यामुळे शिवसेनेचा दुसरा तर महायुतीचा तिसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीने जळगाव महापालिकेत जोरदार सुरूवात केली आहे. काल सायंकाळी भाजपच्या उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यानंतर आज सकाळी प्रभाग क्रमांक १८ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची जागा देखील बिनविरोध निवडून आली. यानंतर प्रभाग क्रमांक नऊमधून माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महायुतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर काही मिनिटांमध्ये मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याची बाब ही लक्षणीय मानली जात आहे. यामुळे महापालिकेत महायुतीने दमदार पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.



