वसई-विरार (वृत्तसंस्था) पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चिंतामण वनगा यांचे गेल्या वर्षी जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगा इच्छुक होते. परंतु भाजपने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पालघरच्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेना-भाजपचे संबंध ताणले गेले होते.
चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपाने त्यांच्या सुपुत्रांना डावलून राजेंद्र गावितांना उमेदवारी दिल्याने श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी पोटनिवडणूक लढवली होती. परंतु ते पराभूत झाले. मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना चांगली टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी यंदा सोडण्यात आली. पण शिवसेनेकडून पालघरमध्ये यंदा पुन्हा भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित उमेदवारी मिळणार असून, ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यामुळे श्रीनिवास वनगा यांचा मात्र, घात झाल्याचे दिसून येत आहे.