मुंबई, वृत्तसंस्था | शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविमा योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यासाठी शिवसेना वांद्रे-कुर्ला संकुलातील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालावर १७ जुलै रोजी मोर्चा काढेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. शिवसेना भवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेच्यावतीने काढला जाणारा मोर्चा हा पीकविमा कंपन्यांसाठी इशारा मोर्चा असेल. शिवसेनेचा मोर्चा हा शेतकरी मोर्चा नसून, तो शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा असणार आहे. हे आंदोलन नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
‘इशारा मोर्चानंतरही जर शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातील सगळी प्रकरणे निकाली निघाली नाहीत, तर शिवसेना शिवसेनेच्या भाषेत विमा कंपन्यांशी बोलेल. शेतकऱ्यांना नडणाऱ्या विमा कंपन्यांना आम्ही योग्य धडा शिकवू,’ अशा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. ‘हा विषय आपल्या अन्नदात्याचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे,’ असे आवाहन करत, ‘कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारावर बँकांची नोटीस लागते. त्याचप्रमाणे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या दारावर लावण्यात यावीत,’ अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी बँकांना केली आहे.
‘सरकार बदलले मात्र यंत्रणा तीच असल्यामुळे योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाही. राज्यातील काही ठिकाणी पीकविम्याची कामे योग्यरितीने झाली. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित आहे. त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. पीकविम्यासंदर्भात आम्ही तज्ज्ञ लोकांशी बोलत आहोत, योजनेत ज्या काही त्रुटी आहेत, त्या समजून घेऊन सरकारला सूचना करून त्यात सुधारणा करून घेऊ,’ असेही ते म्हणाले.