शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळवून देण्यासाठी शिवसेनेने दिला घेराव आंदोलनाचा इशारा

aa1f6054 be36 4355 8c6e 993cc8e07c3d

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांनी १० वर्षांपासून डिमांड नोट भरून वीज वितरण कंपनीकडे एचव्हीडीएस योजनेंतर्गत मीटर कनेक्शनची मागणी केली होती. या शेतकऱ्यांना अद्यापही वीज कनेक्शन मिळालेले नाही. एवढेच नव्हे तर यादीतील त्यांचे नावही गहाळ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटूभोई व शिवसैनिकांनी आज कार्यकारी अभियंता यांना घेराव घालत शेतकऱ्यांना कनेक्शन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच लवकरात लवकर कनेक्शन न दिल्यास सोमवारी (दि.१०) शिवसेना स्टाईलने घेराव आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

 

मुक्ताईनगर तालुक्यात एचव्हीडीएस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन मीटर कनेक्शन देण्याचे काम सुरू होते. मुक्ताईनगर येथील अशोक नामदेव तळले यांनी १४ मार्च २०११ रोजी एचव्हीडीएस योजनेअंतर्गत नवीन वीज कनेक्शन करिता अर्ज करून रुपये ५५०० इतकी डिमांड नोट भरली असताना आठ वर्ष उलटून सुद्धा त्यांना आजही वीज कार्यालयाच्या कंपनीकडे चकरा माराव्या लागत आहेत. त्यांच्यासह तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता वीज वितरण कंपनीकडे अर्ज करून त्यांची डिमांड नोट भरून सुद्धा तब्बल आठ ते दहा वर्षे उलटूनसुद्धा त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मीटर कनेक्शन मिळाले नसल्याच्या कळले आहे. तसेच अशा शेतकऱ्यांची नावेही यादीतून गहाळ करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून झाले आहे. शेतकरी हा इतकी वर्षे वीज कंपनीच्या कार्यालयात वारंवार चकरा मारत होते. अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता अधिकारी हुज्जत घालून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत होते. काही शेतकऱ्यानी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचेशी संपर्क साधून त्यांच्या व्यथा मांडल्या. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर शिवसेनेने लगेच वीज वितरण कार्यालय गाठले व अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना घेराव घातला. सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे व भरलेली डिमांड नोट दाखवत निवेदनाद्वारे लवकरात लवकर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न दिल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांवर अशाप्रकारचा अन्याय झाला असेल, त्यांनी शिवसेना कार्यालय मुक्ताईनगर येथे संपर्क साधावा, असेही आव्हान चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, प्रफुल पाटील अजबराव पाटील, दीपक खुळे, गणेश टोंगे, संतोष माळी, शुभम तळेले, मितेश पाटील, गणेश पाटील, तुषार सोनार यांच्यासह असंख्य शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Add Comment

Protected Content