Home Cities जळगाव भडगाव घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भडगाव घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे शासकीय धान्य नोंदणीच्या राड्यावेळी शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. सत्तेत असलेल्या महायुतीच्या नेत्यांनी या संवेदनशील विषयावर मौन पाळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत, शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस, वादळ आणि वारा यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. दुसरीकडे, बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे पोलिसांचा मार खावा लागत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. भडगाव येथे नोंदणीसाठी आलेल्या हतबल शेतकऱ्यांवर ज्या प्रकारे बळाचा वापर करण्यात आला, त्यावरून सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी महायुतीच्या नेत्यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. जिल्ह्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे मोठे नेते असूनही शेतकऱ्यांवरील या अन्यायाविरोधात ते गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. “बळीराजावर लाठ्या उगारल्या जात असताना सत्तेतील लोक मूक प्रेक्षक बनले आहेत,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणात गोंधळ निर्माण करून लाठीचार्जचे आदेश दिले, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

याप्रकरणी प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवल्यास किंवा दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास, शिवसेना संपूर्ण जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि जळगाव तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शिवसेना रस्त्यावर उतरण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

या आंदोलनाप्रसंगी धरणगाव शिवसेना तालुकाप्रमुख जयदीपबापू पाटील, अरुणदादा पाटील, प्रेमराज राठोड यांच्यासह शिवसेनेचे विविध स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या लाठीचार्जचा निषेध केला असून, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound