यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला प्रचार अधिक तीव्र केला असून, आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छायाताई अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी या रॅलीत सहभाग घेत आपले मोठे शक्तीप्रदर्शन केले.
शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीदरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छायाताई पाटील यांनी रॅलीदरम्यान अनेक ठिकाणी थांबून नागरिक, महिला आणि तरुणांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांचे आशीर्वाद घेतले.

महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक उमेदवारांनीही आपापल्या प्रभागात नागरिकांशी संपर्क साधत, छायाताई पाटील यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. या रॅलीमुळे महाविकास आघाडीच्या बाजूने मोठे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या रॅलीने निवडणुकीला एक नवी ऊर्जा दिली आहे.



