मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निकालच्या १२ दिवसांनंतरही सुटलेला नाही. जर सरकार स्थापनेचा दावा भाजपाने केला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. असे होऊ नये म्हणून आणि कसेही करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र येतील आणि काँग्रेस त्यांना बाहेरुन पाठिंबा देईल. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. या फॉर्म्युलानुसार तीन पक्ष एकत्र आले तर त्यांचं संख्याबळ १५४ होईल. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आघाडीचे लक्ष्यही साध्य होईल. असे असले तरीही शिवसेना काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणूक निकालात महायुतीला जनादेश मिळाला आहे. मात्र भाजपा १०५ आणि शिवसेना ५६ अशा १६१ जागा मिळूनही सरकार स्थापनेसाठी महायुती म्हणून पुढाकार घेण्यात आलेला नाही. अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत अर्धा वाटा अशा दोन अटी शिवसेनेने ठेवल्या आहेत. मुख्यमंत्रीपद वाटण्यासंदर्भात चर्चा झाली नव्हती किंवा तसे काही ठरलेही नव्हते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले. त्यामुळे शिवसेनेने चर्चेची दारे बंद केली. आता भाजपानेही शिवसेना चर्चा करत नाही म्हणून वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊ सत्ता स्थापन करणार अशी चर्चा रंगली आहे. आमच्या पाठिशी १७० आमदार आहेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे संजय राऊत यांनी रविवारीच स्पष्ट केले होते. अशात आता हा सगळा पेच सोडवण्यासाठी काय केले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्तास्थापनेचा दावा करतील आणि काँग्रेस त्यांना बाहेरुन पाठिंबा देईल, अशीही एक शक्यता पुढे येत आहे. असे प्रत्यक्षात घडले तर राज्यात नवे सत्ता समीकरण पहावयास मिळेल. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे आणि राष्ट्रपती राजवटही लागू होऊ द्यायची नाही, असे दोन्ही उद्देश या खेळीतून साध्य होऊ शकतात. असा भाजपा विरोधकांचा व्होरा आहे.