मुंबई, विशेष प्रतिनिधी | राज्य विधानसभेच्या निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी सुरू असताना शिवसेना-भाजप या मित्रपक्षांनीही आपापल्या उमेदवारांच्या स्वतंत्रपणे मुलाखती सुरू केल्या असून आज चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेतर्फे रमेश विक्रम चव्हाण, महेंद्र सिताराम पाटील व उमेश साहेबराव गुंजाळ या तीन उमेदवारांच्या मुंबई येथील सेना भवनात पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती झाल्या आहेत.
मुलाखत दिलेल्यांमध्ये रमेश चव्हाण हे शिवसेनेचे विद्यमान तालुकाप्रमुख असून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्षा सौ. आशा चव्हाण यांचे पती आहेत. महेंद्र पाटील हे माजी तालुकाप्रमुख असून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती व काकडणे येथील सरपंच आहेत. उमेश उर्फ पप्पू दादा गुंजाळ हे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असून अंबरनाथ नगरपालिकेत नगरसेवक तथा सभापती पदावर काम करीत आहेत. सेना-भाजपा युतीमध्ये सुरू असलेली तू-तू, मै-मै पाहता जर या पक्षांमध्ये युती झाली नाही तर या उमेदवारांपैकी एक उमेदवार चाळीसगाव विधानसभेत आपणास निवडणुकीच्या मैदानात पहावयास मिळेल.