मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात पोहोचला असून, शहरात विविध पक्षांच्या प्रचाराचे जोरदार वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भव्य प्रचार रॅली शहरातील मतदारांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याने अंतिम दिवशीचा प्रचार अधिक रंगतदार झाला.
शहरातील नागेश्वर मंदिर, जुने मुक्ताईनगर येथून रॅलीला सुरुवात झाली. संजना पाटील यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. ढोलताशांचा निनाद, शिवसेना पक्षाचे घोषणाबाजी आणि भगव्या पताकांनी नटलेली मोटारफळी यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचा जल्लोष दिसून आला. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली ही रॅली प्रवर्तन चौकापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने ‘शक्ती प्रदर्शन’ करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात उमेदवारांचे स्वागत केले. महिलांचा आणि युवा मतदारांचा सहभाग विशेषत्वाने जाणवत होता. रॅली मार्गावर अनेक ठिकाणी उमेदवारांचे पुष्पवर्षावाने स्वागत करण्यात आले.
प्रवर्तन चौकात रॅलीचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले. या ठिकाणी कामगार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना संबोधित करत आगामी पाच वर्षांसाठी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शिवसेना विकासाच्या कार्यावर विश्वास ठेवते आणि आम्ही मतदारांकडून मतेही विकासाच्या आधारावरच मागत आहोत.” सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण चौकात ठासून भरलेली गर्दी हा शिवसेनेच्या प्रचाराला मिळालेल्या लोकसमर्थनाचा पुरावा ठरला.
निवडणुकीच्या २४ तास आधी झालेल्या या रॅलीने मुक्ताईनगरच्या राजकीय वातावरणात चांगलाच उत्साह निर्माण केला असून कोणत्या बाजूला मतदारांचा कौल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



