मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेनेचेच सरकार येणार असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपाने शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आता जयंत पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात आगामी काळात होणाऱ्या घडामोडींबाबतचे संकेत देतानाच काही सूचक विधानेही केली आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना ‘नमस्कार, जय महाराष्ट्र मी संजय राऊत’ असा मेसेज केला होता. त्यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी केलेल्या या विधानाला अधिकच महत्त्व आल्याचे मानले जात आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल आणि १४५ ची मॅजिक फिगर गाठायची असेल तर शिवसेनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकतात. याच सगळ्याबाबत प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेनेचे सरकार येईल असे म्हटले आहे. तसेच शिवसेनेचे आमदार फोडल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांचे आमदार निवडून आणण्याचा इशाराही दिल्याने भाजपसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.