धरणगाव : भगीरथ माळी
राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील यांचा विधानसभेचा मार्ग सोपा होणार असल्याची चर्चा आतापासूनच रंगायला लागली आहे. परंतु देवकर यांना लोकसभेला अपयश आल्यास ते पुन्हा आमदारकीसाठी उभे राहून शिवसेनेसाठी डोकेदुखी वाढवू शकतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देवकर यांच्याबाबतीत शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे. तर भाजपकडून खासदार ए.टी.पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यास भाजप देवकर यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेच्या मदतीवर अवलंबून राहणार किंवा नेहमीप्रमाणे तुम्ही लोकसभेच्या भाजपला मदत करा, विधानसभेला आम्ही मदत करू, असा फार्म्युला ठरविते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, ना.पाटील यांचा २००९ चा पराभवाचा बदला म्हणून पी.सी. पाटील आणि संजय महाजन यांचा पराभव शिवसेनेने केलाय. आता या पराभवाची फेड भाजपने करण्याचे ठरविल्यास, ही बदल्याची आग शिवसेना-भाजपच्याच अडचणी वाढविणार आणि त्यामुळे लोकसभा-विधानसभा या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीचे काम सोपे होण्याचा धोका आहे.
जळगाव लोकसभेसाठी उमेदवार म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव जाहीर झाले आहे. आमदारकीची तयारी करत असतांना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देवकर यांना थेट लोकसभेसाठी अचानक तयारी करण्याचे आदेश दिल्याने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील समीकरणं पूर्णतः बदलली आहेत. अर्थात देवकारांमुळे लोकसभा निवडणुकीची किती समीकरणं बदलतात, हे तर येणारा काळच सांगणार आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यासारखी दूरदृष्टी असलेला नेता अचानक कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे जळगाव ग्रामीणचे राजकीय समीकरणे बदलवून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय गोंधळ निर्माण करण्याची ही पवारांची खेळी असू शकते. युती झाल्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवून आपआपले उमेदवार खासदारकीला व आमदारकीला निवडून आणण्याचे काम शिवसेना-भाजपने केल्यास दोघं निवडणुकीत राष्ट्रवादीची अडचण वाढणार आहे. त्यामुळे शिवसेना लोकसभेत आणि भाजप विधानसभा निवडणुकीच्या वेळी नेमकी काय भूमिका घेते, यावरच दोघं पक्षांचे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि आजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नेते तुल्यबळ आहेत. दोघांकडे समर्थकांची कमतरता नाही पण जळगाव ग्रामीणमध्ये आमदारकीसाठी भाजपाची भूमिका निर्णायक ठरत असते. मागच्या दोन निवडणुकीत हे दिसून आले आहे. गुलाबराव देवकर निवडून आले, त्यावेळी त्यांचे धरणगाव तालुक्यातील काही भाजप नेत्यांशी असलेली जवळीक हे उघड असलेले रहस्य होते. भाजपच्या मैत्रीचा त्यांना फायदा प्रत्यक्ष होऊन विजय सोपा झाला होता. तर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये भाजपने उमेदवार दिल्याने गुलाबराव पाटील यांचा विजय सोपा झाला होता. परंतु आता युती झाल्यामुळे भाजपचे संजय महाजन आणि पी.सी.पाटील आपापल्या पराभवाचा बदला ना.पाटील यांच्याकडून घेतील की,पक्ष आदेश मानून शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे करतील,हे देखील महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे देवकरांच्या उमेदवारीने जळगाव लोकसभा व जळगाव ग्रामीण या दोन्ही निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणांची कशी उलथापालथ होते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे.