धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पक्षाशी एकनिष्ठ असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने मातोश्रीकडे रवाना झाले असून ते आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर धरणगाव तालुक्यातही दोन गट तयार झाले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये दोन गट तयार झाले आहेत. यातील एक मोठा गट हा माजी मंत्री आ. गुलाबभाऊ पाटील यांच्यासोबत आहे. तर दुसरा गट हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली उध्दव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे दिसून आले आहे.
गुलाबराव वाघ यांनी आधीच तीनदा मातोश्रीवरील बैठकीला हजेरी लावली असून काल रात्री ते आपल्या सहकार्यांसह मुंबईला रवाना झाले आहेत. यात त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, धीरेंद्र पुरभे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. चार लक्झरी गाड्यांमधून शिवसैनिकांनी मुंबईला कूच केले. याआधी परिसरातून सवाद्य मिरवणूक काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आज सकाळी हे सर्व जण मुंबईला पोहचले असून दुपारी त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी भेट होणार असल्याचे वृत्त आहे.