
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भुसावळ शहरातही या ऐतिहासिक निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येत आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले.

युतीच्या घोषणेनंतर भुसावळात शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत, एकमेकांना मिठाई वाटून आणि आनंद व्यक्त करून या युतीचे स्वागत केले. दीर्घकाळानंतर मराठी राजकारणात महत्त्वाची घडामोड घडल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, रेल कामगार सेनेचे ललित मुथा, उत्तमराव सुरवाडे, कट्टर शिवसैनिक नमाभाऊ शर्मा, राजूभाऊ इंगळे, दिलीप सुरवाडे, संदीप चव्हाण, नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी, महेश पवार, प्रथमेश चौधरी आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसेकडून दीपक आत्माराम सोनवणे (शहर अध्यक्ष, भुसावळ), तुषार वाढे (तालुका अध्यक्ष, भुसावळ), विलास कोळी (तालुका सचिव), प्रतीक भंगाळे (जिल्हा उपाध्यक्ष, मनविसे), प्रणय भागवत (तालुका अध्यक्ष, मनविसे), दशरथ सपकाळे, रोहित सपकाळे यांच्यासह अनेक मनसैनिक या जल्लोषात सहभागी झाले होते.
युतीमुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. भुसावळ शहरात साजऱ्या झालेल्या या जल्लोषातून स्थानिक पातळीवरही युतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
एकूणच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांची युती जाहीर होताच भुसावळात झालेला उत्स्फूर्त जल्लोष हा मराठी राजकारणातील नव्या पर्वाची चाहूल देणारा ठरला आहे.



