Home धर्म-समाज हरताळा येथे शिवजयंती उत्साहात; सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण शिवमय

हरताळा येथे शिवजयंती उत्साहात; सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण शिवमय


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील हरताळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात, सांस्कृतिक आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली.

यानंतर गावातून पारंपारिक वेशभूषेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांनी नऊवारी साडी परिधान करून शिवकालीन संस्कृतीचे जिवंत दर्शन घडविले. “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

यावेळी आयोजित कार्यक्रमात शिवचरित्रावर व्याख्यान, पोवाडा गायन तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगत स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान अधोरेखित केले आणि त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र हवालदार संदीप वानखेडे यांच्या हस्ते शिव जयंती उत्सव समितीला प्रदान करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांना ‘आरोग्य दूत’ म्हणून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैभव तायडे, अविनाश महाजन, अजय उदळकर, कमलेश भगत, अभिजीत देशमुख, महेंद्र तायडे, योगेश तायडे, भूषण कान्हे, कुणाल लोखंडे, निलेश मोरघडे, दीपक काळे, सुमित चौरे, तेजस वानखेडे, महेश भोईटे तसेच शिव जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव तायडे यांनी मानले.


Protected Content

Play sound