Home आरोग्य शिरसाळा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड ; तुंबलेल्या गटारांमुळे आरोग्य धोक्यात

शिरसाळा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड ; तुंबलेल्या गटारांमुळे आरोग्य धोक्यात


बोदवड -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिरसाळा ग्रामपंचायतीच्या निष्काळजी आणि मनमानी कारभाराचा फटका थेट नागरिकांच्या आरोग्याला बसत असून, दलीत वस्ती भागातील गटारे तुंबल्याने परिसरात भीषण अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सांडपाणी, दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले असून ग्रामपंचायतीकडून मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

दलीत वस्ती परिसरात अनेक दिवसांपासून गटारे पूर्णपणे घाण पाण्याने तुंबलेली आहेत. सांडपाणी थेट रस्त्यावर साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना ये-जा करणेही अवघड झाले आहे. याच भागातील सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय बनली असून अस्वच्छतेमुळे महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

केवळ दलीत वस्तीच नव्हे तर शिरसाळा गावातील इतर परिसरातील गटारांचीही अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी गटारी साफसफाईअभावी तुंबलेल्या अवस्थेत असून, पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली स्वच्छता ग्रामपंचायतीकडून करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. गटारी साफ न केल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे तसेच ग्रामसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामसेवकांचा मनमानी आणि निष्काळजी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, संबंधित ग्रामसेवकांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिसरातील गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी व नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे


Protected Content

Play sound