Home राजकीय मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल 90 जागा

मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल 90 जागा


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवघ्या पंधरा- सोळा दिवसांत मतदान होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या धावपळीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून तीव्र संघर्ष पाहायला मिळत असताना, मुंबई महापालिकेच्या रणांगणात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासमोर निर्णायक बाजी मारल्याचे चित्र समोर आले आहे. 227 जागांच्या मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल 90 जागा मिळाल्याने महायुतीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी जागावाटपावरून तणावाचे प्रसंग, कार्यकर्त्यांची नाराजी, आंदोलन आणि टोकाच्या प्रतिक्रिया दिसत असताना, मुंबईत मात्र शिंदे गटाने संयम आणि रणनीतीच्या जोरावर वाटाघाटी यशस्वी केल्या. लोकसभा, विधानसभा आणि मागील महापालिका निवडणुकांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही, मुंबईत शिवसेनेला सन्मानजनक वाटा मिळवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत.

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या चर्चेत भाजपकडून शिंदे गटाला केवळ 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मागील निवडणुकीत एकत्र शिवसेनेचे 84 नगरसेवक असतानाही कमी जागांचा प्रस्ताव आल्याने शिंदे गटात नाराजी होती. आपल्या सिटिंग जागा सोडायच्या नाहीत, हा ठाम निर्धार शिंदे यांनी केला आणि त्यानुसार वाटाघाटींना सुरुवात झाली.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर 39 नगरसेवकांनी त्यांना थेट साथ दिली होती, तर अन्य पक्षांतील 21 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. त्यामुळे शिंदे गटाकडे एकूण 60 सिटिंग नगरसेवक होते. या सर्वांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिंदेंनी धरला, तसेच मागील निवडणुकीत जिंकलेल्या 84 जागांवर दावा कायम ठेवत काही जागांची अदलाबदल करून अखेर 90 जागांपर्यंत मजल मारली.

या वाटाघाटीत शिंदेंचे दोन खास मोहरे निर्णायक ठरले. उदय सामंत आणि राहुल शेवाळे या दोघांनी भाजपसमोर शेवटपर्यंत खिंड लढवत 52 वरून थेट 90 जागांपर्यंतचा प्रवास साध्य केला. ‘U R my Star’ असे म्हणत शिंदेंनी आपल्या या दोन विश्वासू नेत्यांचे कौतुक केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेना–भाजप चर्चांची सुरुवात दादरमधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात झाली होती. मात्र वाटाघाटी तीव्र होत गेल्यानंतर चर्चेचे केंद्र हळूहळू एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी सरकले. शिवसेना फुटीनंतर नंदनवन हे शिंदे गटाचे पॉवर सेंटर बनले असून, येथे पहाटेपर्यंत चाललेल्या चर्चांमधूनच अंतिम तोडगा निघाला.

या युतीत भाजपच्या वाट्याला 137 जागा आल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. आता 137 जागांवर विजय मिळवण्याचे आव्हान भाजपसमोर असून, दोन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी 114 या मॅजिक फिगरकडे डोळे लावून बसले आहेत.

मुंबईत यंदा महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंची शिवसेना-मनसे आघाडी, काँग्रेस-वंचित यांची आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि स्वतंत्र लढणारी अजित पवारांची राष्ट्रवादी, तसेच रिपब्लिकन पक्षाची वेगळी भूमिका यामुळे लढत बहुरंगी झाली आहे. या सर्व घडामोडींमध्ये मुंबईच्या महापौरपदी अखेर कोण विराजमान होणार, हे 16 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे.

एकूणच बलाढ्य भाजपासमोरही ठाम भूमिका घेत शिंदे गटाने मुंबईत 90 जागा मिळवत आपली ताकद दाखवली असून, U–R फॉर्म्युल्यामुळे महापालिकेचे राजकीय गणितच बदलले आहे.


Protected Content

Play sound