Home राजकीय लातूर महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा मास्टरस्ट्रोक ; ३८ अपक्ष उमेदवार आज शिवसेनेत...

लातूर महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा मास्टरस्ट्रोक ; ३८ अपक्ष उमेदवार आज शिवसेनेत प्रवेश करणार


लातूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याआधीच लातूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिंगणात असलेले तब्बल ३८ अपक्ष उमेदवार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

एकाचवेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना शह देण्याची रणनीती आखत एकनाथ शिंदे यांनी लातूरमध्ये मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या ३८ अपक्ष उमेदवारांचा शिवसेना शिंदे गटात अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. या प्रवेशामुळे लातूर महापालिका निवडणुकीतील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होणार असून, अपक्षांची ताकद थेट शिंदे गटाच्या पारड्यात जाणार आहे.

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १८ प्रभाग असून ७० जागांसाठी ही लढत होत आहे. भाजपाने सर्व ७० जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करत ७० पैकी ६५ जागांवर काँग्रेस तर पाच जागांवर वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने पाच जागांवर उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ६० जागांवर थेट उमेदवार दिले असून दहा जागांवर पुरस्कृत उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या पक्षाची अंतिम भूमिका स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने १७ जागांवर अधिकृत उमेदवार उभे करत स्वतंत्र लढत दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाने सध्या ११ जागांवर अधिकृत उमेदवार उभे केले असून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने नऊ जागांवर उमेदवार दिले आहेत, तर एमआयएमनेही नऊ जागांवर आपले उमेदवार उभे केले असून सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

लातूर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीचा आढावा घेतला असता, २०१४ मध्ये राज्य व केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर बदललेल्या राजकीय वातावरणाचा थेट फायदा भाजपाला झाला होता. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये भाजपाने नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली ३६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्या निवडणुकीत शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना खातेही उघडता आले नव्हते.


Protected Content

Play sound