मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेत उभी फुट पाडून मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा नवीन धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे आता थेट दादरमध्ये दुसरे शिवसेना भवन उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी जागेची चाचपणी केल्याचे समजते. या संदर्भात त्यांचे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी-माझा या वाहिनाशी बोलतांना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आपण शिंदे गटाचे दादरमध्ये कार्यालय सुरू करणार असले तरी ते प्रति-शिवसेना कार्यालय म्हणता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादरमध्ये शिवसेना भवन असतांना शिंदे गटाने थेट आता याच परिसरात मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले गेले आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी शिवसेना भवनाच्या परिसरातील इमारतींची पाहणी करण्यात आल्याचे समोर आले आहे.