मुंबई–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत वाढत चाललेल्या मतभेदांनी आता उघड रूप धारण केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीकडे शिवसेना शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी पाठ फिरवल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावाचा फटका सरकारच्या अंतर्गत समन्वयावर स्पष्टपणे उमटताना दिसत आहे. या घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर केवळ दोनच दिवसांत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे दिल्ली गाठत अमित शाह यांच्याशी थेट चर्चा करताना दिसले.

एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर सकाळी पोहोचले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. शिंदे गटाने व्यक्त केलेली नाराजी, महायुतीतील जागावाटप, निवडणूक धोरण आणि पुढील राजकीय समीकरणे या सर्व बाबींवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदेंच्या या दिल्ली भेटीला सध्याच्या परिस्थितीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

याचदरम्यान, शिंदेंच्या अचानक दिल्ली रवाना झाल्यानंतर मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तातडीची बैठक पार पडली. शिंदे गटाची वाढती नाराजी कशी कमी करायची आणि महायुतीची एकजूट कायम कशी ठेवायची, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. नाराजी आणखी तीव्र झाल्यास पुढील पर्याय काय असू शकतात, यावरही या बैठकीत विचारमंथन झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेला बहिष्कार हे सरकारमधील अंतर्गत तणावाचे मोठे लक्षण मानले जात आहे. जागावाटप आणि निर्णयप्रक्रियेत योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याबाबत शिंदे गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. मात्र शिंदे गटातील प्रमुख नेते प्रताप सरनाईक यांनी “कुटुंब म्हटलं की थोडेफार मतभेद असतातच; आमच्यात नाराजी नाही,” असे स्पष्टीकरण देत वाद शमवण्याचा प्रयत्न केला. तर एकनाथ शिंदेंनी नाराजीविषयी बोलणे टाळत मौन बाळगणे पसंत केले.
दरम्यान, शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर ते बिहारच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेंनी दोन सभा घेतल्या होत्या. एनडीएच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी ते बिहारला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्याच्या राजकारणात सुरू असलेली ही हालचाल महायुतीच्या अंतर्गत संगनमताला मोठा धक्का असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता निर्माण झाली आहे.



