Home Cities जळगाव महापालिकेत शिंदे गटाचा ‘डंका’; प्रभाग १९ ‘अ’ मधून रेखा पाटील बिनविरोध

महापालिकेत शिंदे गटाचा ‘डंका’; प्रभाग १९ ‘अ’ मधून रेखा पाटील बिनविरोध


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने महापालिकेत विजयाची जोरदार सलामी दिली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून, महायुतीच्या एकूण पाच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यात एकट्या शिवसेना शिंदे गटाने चार जागांवर ‘चौकार’ लगावत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

रेखा पाटील यांची बिनविरोध निवड:
आज २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. या प्रभागातून शिवसेनेच्या रेखा चुडामण पाटील यांच्या विरोधातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. शिंदे गटाची ही चौथी जागा असून, यामुळे महायुतीच्या बिनविरोध निवडीचा आकडा पाचवर पोहोचला आहे.

यांनी मारली बाजी:
या निवडणुकीत बिनविरोध निवडीचा सिलसिला सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. प्रभाग १८ ‘अ’ मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांनी विजयाचे खाते उघडले होते. त्यानंतर प्रभाग ९ ‘अ’ मधून मनोज चौधरी आणि प्रभाग ९ ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख यांची निवड बिनविरोध झाली. प्रतिभा पाटील यांनी माघार घेतल्याने देशमुख यांचा मार्ग मोकळा झाला होता. दुसरीकडे, प्रभाग १२ ‘ब’ मधून भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

विरोधकांचे पानिपत:
महापालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी शेकडो उमेदवार रिंगणात असताना, अर्ज माघारीच्या दिवशी झालेल्या या मोठ्या घडामोडींनी विरोधकांच्या गोटात शांतता पसरली आहे. महायुतीमधील जागावाटप आणि रणनीतीमुळे पाच जागांवर मतदानाची वेळच येणार नसल्याने युतीचे पारडे जड झाले आहे. आता उरलेल्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार असून, या बिनविरोध निवडींमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.


Protected Content

Play sound